Thursday, June 24, 2010

ब्रायन सिंगरचा अविस्मरणीय युज्वल सस्पेक्ट्स




रहस्यपटांबद्दल बोलायच तर रहस्यावर अवलंबून चित्रपट अशी त्यांची व्याख्या अजून तरी बदलली नसली तरीदेखील त्याच्या सादरीकरणात कमालीची विविधता आहे.किंबहूना साध्या रहस्यपटापेक्षा थोडा वेगळं वळण देऊन मुख्य संकल्पना मांडायची आणि ती सांगतानाच अशी सांगायची कि तीच खरी आहे यावर सर्वांच ठाम मत आहे तरीदेखील काहीतरी अजून गुढ त्यात लपलयं याची जाणीव प्रेक्षकाला करुन द्यायची.आता प्रेक्षक आपोआपच त्याकथेत गुंतायला लागतो.तो त्या प्रत्येक संभावनेचा विचार करतो जी त्याला अपेक्षित असते,किंबहूना दिग्दर्शक त्याला त्यासाठी भाग पाडतो.मग पुढे असा काही पेच निर्माण होतो की प्रेक्षक सुद्धा त्यातून बाहेर पडण्यासाठी शेवटाकडे जाण्याची वाट बघायला लागतो.अशावेळी त्याने कितीही शक्यतांचा विचार केला तरी त्यासर्व चूकीच्या ठराव्या अशीच त्याची अपेक्षा असते कारण शेवटी त्याला फ़सायच असत,फ़सण्यामधलं सुख त्याला अनुभवायच असतं.हि अशी त्याची रहस्यपटाकडून असलेली अपेक्षा अतिशय योग्य आहे त्यात काहीही चुक नाही.मग अशावेळी त्याची दिशाभूल झाली तरी त्याला चालत,आणि आजकाल अशी दिशाभूल करण्य़ासाठी सर्वात फ़ायदेशीर ठरणार तंत्र म्हणजे अनरिलाएबल नॅरेशन.अमुकतमुक घडलय अस प्रेक्षकाला विश्वासात घेऊन पटवून द्यायच आणि नंतर जिथे सुरुवातीला होतो तिथेच आणून सोडायच.असे सिनेमे खरेतर वर्तुळासारखे असतात.यात प्रमुख पात्र म्हणजे केंद्र आणि त्याभोवती सगळ फ़िरत असत.अशावेळी तोच खोटारडा असेल तर संपूर्ण वर्तूळ खोटा ठरतो.पण तरीदेखील तोच वर्तुळ आपल्याला भावतो.कारण नोलानने प्रेस्टिजमध्ये म्हणटल्याप्रमाणे आपल्याला वेडं बनायच असतं.पण अशावेळी प्रेक्षकाला विश्वासात घेण अतिशय महत्वाच असत कारण त्याची होणारी दिशाभूल ही त्याची फ़सवणूक आहे अस वाटता कामा नये.त्यामूळे अशा अनरिलाएबिलिटी साठी महत्वपूर्ण असते पटकथा,त्यातला तपशील आणि शेवटाला ग्राह्य धरून दिल्या जाणारया हिंट्स.कारण एकदा का शेवट कळला कि प्रथमतः तो फ़ार थ्रिलिंग वाटतो मात्र पुन्हा बघितल्यावर त्यातला उथळपणा लक्षात यायला फ़ारसा वेळही लागत नाही किंवा प्रेक्षकही तेवढा तगडा लागत नाही.त्यामूळे नुसती काहीही कथा सांगून त्याचा भलताच शेवट करायचा असं दिग्दर्शकाने ठरवलं कि त्याच्या सिनेमाचा शेवट पक्का असतो अस म्हणायला हरकत नाही.

रहस्यपटात किंवा भयपटात.शेवटाला सर्वाच्च महत्व असतं त्यामूळे दिग्दर्शकाला आणि लेखकाला सगळ्यात महत्वाचे असतात ते शेवटाचे काही क्षण.ह्यात अनेक सिनेमे फ़ोल ठरतात,किंबहूना आपल्या अपेक्षा पुर्ण करण्यास त्या असमर्थ ठरतात.शेवटामूळे गाजलेल्या सिनेमे अनेक आहेत.मग तो कॅलीगरी असो,सिटिझन केन असो,निकोल किड्मनचा अदर्स किंवा नुकताच आलेला शटर आयलँड.सगळ्यांच सुत्र एकच कि सगळ्या गोष्टी समोर असून सुद्धा त्याच्याकडे बघण्याचा प्रेक्षकाचा दृष्टीकोन बदलवून टाकायचा,त्याला संपुर्णपणे चेकमेट करायचा आणि त्याला असा शेवट द्यायचा ज्याची त्याला कणभरसुद्धा अपेक्षा नसते.ह्यासर्व चित्रपटांत एक चित्रपट असा होता ज्याने प्रेक्षकाला रहस्य आणि अनरिलाएबिलिटी बरोबरच एका उत्कृष्ट न्वारची देखील चव चाखायला दिली,तो चित्रपट म्हणजे ब्रायन सिंगरचा दोन आँस्कर जिंकलेला"युज्वल सस्पेक्टस"

युज्वल सस्पेक्ट्सच कथानक आहे ते घडलेल्या एका बोटीवरील स्फ़ोटाविषयीच.पोलीस तिथे झालेल्या ९१ मिलियच्या डोप डिलच स्फ़ोटात झालेल रुपांतर आणि तिथे मेलेल्या २७ जणांबद्दल तपास करत आहेत.त्यात जेमतेम दोनच जण वाचले असून एक जण माफीचा साक्षीदार असून दुसरा त्याआगीत बराच जळालेला असल्यामूळे दवाखान्यात आहे.ह्यातला माफीचा साक्षीदार आहे व्हर्बल किंट(केविन स्पेसी).त्याला माफ़ीचा साक्षीदार म्हणून सोडण्यात आलेल आहे तरी देखील त्या बोटीवर काय झालं आणि तिथे असणारा डिन किटन(गॅब्रिएल ब्रान)नक्की मेला आहे की नाही ह्याची खात्री करून घेण्यासाठी एजंट डेव्ह कुयानला(चाझ पाल्मिंट्री) त्याची चौकशी करायची आहे.इथून व्हर्बल त्याची आणि गँगची ६ आठवड्यापुर्वीपासूनची गोष्ट सांगायला सुरुवात करतो.एका बऱ्याच मोठया दारूगोळा असणाऱ्या ट्रकच हायजॅक होणं आणि चोर म्हणून लेबल लागलेल्या ह्या पाच जणांना कधीही पोलीस उचलून कोठडीत टाकण ह्यामूळे त्याचा बदला घेण्याचा त्यांचा विचार आहे.आता हे पाच जण म्हणजे मॅकमॅनस(स्टीफन बाल्डविन) ज्याची बडया चोऱ्यांमध्ये ख्याती आहे,त्याचा सहकारी फ़ेन्स्टर(बेनिशीओ डेल टोरो),टाँड हॉकेनी(केविन पोलॉक)जो विस्फ़ोटकांमध्ये प्रवीण आहे,डिन किटन(गॅब्रिएल बाय्र्न) जो माजी पोलीस असल्यामूळे अतिशय हुशार आणि बुद्धीमान आहे आणि शेवटचा म्हणजे व्हर्बल किंट(केविन स्पेसी)जो योजना आखण्यात अतिशय कुशल आहे पण बिचारा पांगळा आहे.पोलीसांचा बदला घ्यायचा असल्यामूळे व्यवस्थित पणे ते पोलीसांच्या स्मगलर्ससाठी चालणाऱ्या टॅक्सी सर्विसचा पर्दाफ़ाश करतात आणि स्मगलींगचे खडे घेऊन कॅलिफोर्नियाला जातात,तिथे अजुन एक कामाची सुपारी देऊ घेतात.इथेदेखील ते काम चोख पार पाडतात पण स्मगर मारला जातो आणि हिरे किंवा पैसे त्याच्याकडे नसून फ़क्त ड्र्ग्स असल्यामुळे तेदेखील बुचकळ्यात पडतात.कोणीतरी अतिशय अस्खलितपणे त्यांना पोलीस लाईन अप पासून ते इथेपर्यंत आणल्या गेल्याची जाणीव त्यांना होते.प्रत्येकाकडुन अजाणतेपणाने एका बऱ्याच ताकदवर क्राईमलॉर्डच फ़ार मोठ नुकसान झालेल असून त्याच कर्ज फ़ेडणं बाकी आहे अस त्यांना वकील कोबायाशी(पीट पॉस्टेलथ्वे) सांगतो.हा ताकदवर क्राईमलॉर्ड दुसरा तिसरा कोणीनसून स्वतः कायझर सोझे आहे हे सांगितल्यानंतर मात्र प्रत्येकाची चांगलीच फ़ाटते.आता ह्या कायझर सोझेचा इतिहास अतिशय धक्कादायक तसाच भीतिदायक देखील आहे.तसच त्याला ह्या पाचही जणांबद्दल सगळ काही माहित आहे.त्याच कर्ज फ़ेडण्यासाठी दुसऱ्या एका स्मगलींग ग्रुपची ९१ मिलियनची डील उधळून लावायची आणि कर्जातून मोकळं व्हायच.अशीत्यांची डिल आहे.पुढे ह्या डिलचं नक्की काय होतं आणि मुख्य म्हणजे किटनच काय होतं हे आणि कुयान व्हर्बलच्या जुबानी संतुष्ट आहे कि नाही हे पुढे कळत.पण खरतर युज्वल सस्पेक्ट्सचा शेवट बघायचा तो फ़क्त एकाच गोष्टीसाठी आणि ती गोष्ट म्हणजे"हु इस कायझर सोझे???????"

युज्वल सस्पेक्ट्सचा इफ़ेक्ट खरतर फ़ार जबरदस्त आहे,कारण तो संपल्यावर सुद्धा मनावर तोच अधिराज्य गाजवत असतो.ख्रिस्तोफर मॅक्विरीची स्क्रिप्ट अतिशय काळजीपुर्वक आणि मोठ्या कौशल्याने बांधण्यात आली आहे.ब्रायन सिंगरच दिग्दर्शन खरोखरीच कौतुकास्पद आहे,किंबहूना हा त्याचा आजवरचा सर्वोत्कृष्ठ सिनेमा असून त्याने वापरलेले प्रसंगांना अनुसरून असलेले विनोद खरच उत्कृष्ठ आहेत.पण यात खरा कस लागलाय तो म्हणजे एडिटर जॉन ऑटमनचा आणि सर्व सहाही मुख्य पात्रांचा.सिनेमा बघितल्यावर एडिटिंगची कमाल लगेच जाणवेल.अभिनेत्यांचा अभिनय इतका खरा झाला नसता तर युज्वल एवढा यशस्वी नक्किच होऊच शकला नसता.डेल टोरो,बाल्डविन,पोलॉक ह्यांचा मेथडिक अभिनय मस्त आहे पण खरी बाजी मारली आहे ती गॅब्रिएल बाय्र्न आणि ऑस्कर विजेता केविन स्पेसीने.भुमिकेत जगणं काय असत हे ह्या दोघांकडुन कळत.

युज्वल सस्पेक्ट्सचा आत्मा दडलाय तो शेवटच्या २० मिनिटांत.ट्विस्ट एन्डींग म्हणजे नक्की काय हे हा सिनेमा बघितल्याशिवाय कळण शक्यच नाही.युज्वल सस्पेक्ट्स खरतर कमीतकमी तीनदा तरी बघावा.पहिल्यांदा रहस्यासाठी,दुसऱ्यांदा पटकथेसाठी आणि तीसऱ्यांदा अभिनयासाठी.मला खात्री आहे की कितीही वेळा बघितला तरी तो कंटाळवाणा होणारच नाही.शेवटी युज्वल सस्पेक्ट्सला मी हिचकॉकीयन पठडीतला मानतो कारण ह्यात ट्रान्स्फ़र ऑफ गिल्टचा अनुभव प्रकर्षाने जाणवतो तसच हिचकॉकच्या प्रत्येक चित्रपटात एक पंच लाईन सतत असते जी मनावर फ़ार मोठा आघात करते ह्यातही एक अशीच लाईन आहे जी आजवरच्या सर्वोत्कृष्ठ पाच लाईन्स मध्ये नेहमीच गणली जाईल आणि ती म्हणजे"The Greatest Trick The Devil Ever Pulled Was Convincing The World That,HE NEVER EXISTED"

अनिकेत सुरगुडे

Sunday, June 13, 2010

वेगळा आणि प्रगल्भ भयपट १४०८



"मानवी मन हे अनेक दुःखांनी भरलय आणि त्यामूळेच कोणत्याही सैतानासाठी मानवी मन हे सर्वात सोपं भक्ष्य आहे" अस स्टिफ़न किंगच वाक्य.त्याची प्रचिती किंवा उदाहरण म्हणून त्याने रचलेली कथा म्हणजे १४०८.ह्यातल तथ्य त्यालाच कळत ज्याला त्याचा अनुभव आलाय.मग तो कोणीही असो त्याला भिती वाटणारच.अस काही घडल की भिती ह्या शब्दाची व्याख्या आपोआपच बदलते.आता ह्याचच उदाहरण म्हणजे मिकाएल हॉस्ट्रोम दिग्दर्शित १४०८.स्टिफ़न किंगच्या कथेवर आधारलेला १४०८ हा खर भयपट असुन सुद्धा केवळ धक्क्यांवर आधारलेला सिनेमा नसून,त्याच मुळ फ़ार खोलवर आघात करणार आहे.खरतर भयपटांची विभागणी करायच झाल तर त्याचे दचकवणारे आणि घाबरवणारे असे दोन प्रकार पडतील.साधारणतः कोणालाही भयपटाकडुन अपेक्षा असते ती म्हणजे अनेक थ्रिलिंग दृष्यांची किंवा दचकवणारया प्रसंगांची.जि पुर्ण करण्याच्या नादात मुळ संकल्पनेचा बट्ट्याबोळ होतो.तर दुसरे म्हणजे भयाच्या मुळापर्यंत पोहोचणारे,जे बरयाच कमी प्रेक्षक वर्गाला भावतात.आता अशा चित्रपटांमध्ये महत्व असत ते प्रेक्षकाच त्या कथेतल्या मूळ पात्राशी संबंध जोडण्याच आणि दुसर म्हणजे रहस्य अबाधित ठेवण्याच.अतिरंजीत भयपटापेक्षा साधारण,कमी इफ़्फ़ेक्ट्स असलेला भयपट कसा रंगतो ह्याच उदाहरण म्हणजे मिकाएल हॉस्ट्रोमचा १४०८.

१४०८ च कथानक फ़िरतं ते माईक एनस्लिनच्या(जॉन क्यूसॅक) भोवती.’१० स्कॅरीएस्ट लाईटहाऊस,’१० स्कॅरीएस्ट शिप्स’ अश्या रंजक पुस्तकांचा तो लेखक आहे.त्याचे वडींलांबरोबरचे संबंध काही चांगले नाहीत.तसच मेलेल्या मूलीच दुःख तो आपल्या उराशी बाळगून आहे.लॉस एंजेलिसला सी सर्फ़िंग करताना त्याला दुखापत होते.दुसरया दिवशी पोस्ट ऑफिसमध्ये त्याला आलेल्या इन्विटेशन्स मध्ये डॉल्फिन हॉटेलच पोस्टकार्ड त्याला सापडत."डू नॉट एंटर १४०८" असं त्यावर लिहिलं असल्यामूळे हेच माझं पुढच डेस्टिनेशन अस तो ठरवतो.आपल्या पब्लिशरला फ़ोन करुन तो १४०८बद्दल अजुन माहिती मिळवतो.त्याच्या शंकेने माईकची १४०८ मध्ये जाण्याची अजुनच बळकट होते.डॉल्फिन हॉटेलचा फोनवरुन काही प्रतिसाद न मिळाल्यामूळे तो थेट हॉटेलमध्ये प्रवेश करतो.तिथे हॉटेलचा मॅनेजर जेराल्ड ओलिन(सॅम्युएल जॅकसन) त्याला आपल्या केबिनमध्ये बोलावतो आणि १४०८मध्ये घडलेल्या रहस्यमयी मृत्युंबद्दल तो माईकला सांगतो.तिथे झालेल्या मृत्यूंचा खरा आकडा आम्ही दाखवला तर चक्रावशील अस जेराल्ड परत परत सांगतो तरीसुद्धा आपलीच खरी करत माईक १४०८ मध्ये राहण्याचा हट्ट सोडत नाही.एक महागडी दारूची बाटली देऊ करुन सुद्धा माईक आपला हट्ट सोडत नाहीये हे बघून शेवटी १४०८ची चावी माईकला द्यायला जेराल्ड तयार होतो.१४व्या मजल्यावरल्या १४०८ मध्ये प्रवेश करताच तो संपूर्ण खोलीची निरखून पाहणी करतो.अचानक विचित्र अनुभव त्याला येऊ लागतात.हे थांबल्यानंतर तो तो आराम करण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात तेथील घडयाळ ६० मिनिटांचा काऊंटडाऊन वेळ दाखवायला सुरुवात करतो.पुन्हा अतिशय चमत्कारिक प्रसंग घडायला सुरुवात होते.घाबरल्यामूळे तेथून बाहेर पडण्याच्या बेतात असतानाच अचानक दरवाजा कुलुपबंद होऊन चावी दरवाज्यात निघून जाते.अचानक एक अस्प्ष्ट आकृती त्याच्या खिडकीतुन बाहेर उडी मारते.पूढे तो समोरच्या बिल्डींगमधल्या माणसाला हातवारे करुन मदत कर असं सांगण्याचा प्रयत्न करतो मात्र तो सुद्धा माईकचं आहे हे बघून तो चकीत होतो.त्याच्या मागून एक विचित्र व्यक्ती त्याच्यावर हल्ला करतीये अस माईकला जाणवत,पण तो त्याचा भास असतो.स्वतःला शांत करत तो हे सगळ जेराल्ड्ने दिलेल्या दारुमुळे आणि रुममधल्या चॉकलेट्समूळे होतय असा विचार करत असतानाच टिव्हीवर अचानक त्याचा घरचा विडिओ लागतो.मेलेल्या मुलीच्या आठवणींमूळे तो अजुनच त्यात गुंतत जातो.वडीलांच्या आणि मुलीच्या आठवणींमुळे स्वतःचा स्वार्थीपणा त्याला कळून चुकतो.पुढे नशीबाने तो आपल्या पत्नीबरोबर विडिओ चॅट करून तिला तिथल्या परिस्थिती बाबत सांगतो आणि पोलिसांना बोलावायला सांगतो.एवढ्यात संपुर्ण खोली पाण्याने भरुन जाते आणि अचानक माईक सुरुवातीला असणारया समूद्राच्या ठिकाणी पोहोचतो.ही सत्य परिस्थिती आहे कि त्याचा भ्रम हे पुढे कळत.तो सुखरुपपणे १४०८ मधून बाहेर पडतो की नाही आणि १४०८च काय होत हे चित्रपटाच्या उरलेल्या भागात सांगितल जात.

सिनेमातले काही सिन्स खरोखरीच खोल परिणाम करणारे,आणि निःशब्द करणारे आहेत.त्यातला एक म्हणजे आपल्या मेलेल्या मूलीशी बोलत असताना माईक तिला मिठी मारतो आणि पुन्हा एकदा ती मरते हा सिन खरोखरीच स्तब्ध करणारा आहे.१४०८ हा त्याच्या आकडयापासूनच १३ हा सैतानाचा आकडा दाखवायला सुरुवात करतो.अनेक दृष्यातून उत्कटपणे मांडण्यात आलेला १३ हा आकडा खरतर चित्रपटकर्त्यांची हुशारीच म्हणता येईल.बाकी कॅमेरावर्क अतिशय सुंदर आहे.भयपटांसाठी अपेक्षित असणारे विचित्र अँगल्स नसले तरी त्याची प्रखरता तेवढीच आहे.शांत तरीदेखील परिणामकारक संगीताचा उत्तम वापर त्याची गूढता वाढवतो.मिकाएल हॉस्ट्रोमचे आधीचे सिनेमे(डिरेलेड आणि तत्सम) आणि हा याचा विचार केल्यास दिग्दर्शकाची उत्क्रांती लक्षात येण्याजोगी आहे.जॉन क्यूसॅक ह्याचा खरतर "वन मॅन शो" आहे अस म्हणटलं तरी हरकत नाही तरीदेखील काही वेळासाठीच असणारा सॅम्युएल जॅकसन लक्षात ठेवण्याजोगा अभिनय करुन जातो.

१४०८ची परिणामकारकता हि त्याच्या असणारया रहस्यातच आहे.हे रहस्य प्रत्येकालाच लहानपणापासून माहीत असत,कारण ते प्रत्येक व्यक्तीच स्वतःचच असत.काही विशिष्ट घटना आपल्याकडून चुकून घडून गेलेल्या असतात ज्याची उकल लगेच होऊन सुद्धा आपण तिच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो.त्यापासून दूर जातो आणि दुसरीकडे मन रमवण्याचा प्रयत्न करतो.सरतेशेवटी १४०८चा सैतान हा सर्वश्रेष्ठ आहे कारण तो कोणीनसून आपण स्वतःतलाच आहे.ज्याचा सामना करण फ़ार कठीण आहे.त्यामूळे सिनेमाच्या टॅगलाईन प्रमाणेच हे म्हणणं खर ठरेल की "सम रुम्स आर लॉक्ड फॉर अ रिसन"

अनिकेत सुरगुडे