Wednesday, February 9, 2011

सिनेमॅटीक परफ़ेक्शन आणि सिक्रेट इन देअर आईज्


सिक्रेट इन देअर आईज् मध्ये एका दृष्यात रिकार्डो बेंजामिनला म्हणतो,"यु सेड लाईफ़".वरवर हि एक अतिशय सामान्य ओळ आहे,पण त्याच्यासाठी नाही ज्याने सिक्रेट बघितलाय.त्यातली आर्तता आणि त्याची व्याप्ती त्यालाच कळेल ज्याने सिक्रेट बघितलाय.दिग्दर्शक जुआन जोस कँप्बेलाच्या ह्या सिनेमाने ऑस्कर जिंकुन जवळपास सर्वांनाच आश्चर्यचकित केल.हेन्केच्या ’व्हाईट रिबन’ आणि"प्रोफ़ेट’सारख्या तुफ़ान सिनेमांना डावलून सिक्रेटला पुरस्कार मिळेल ह्याची अपेक्षादेखील फ़ार थोडयांना असेल.पण खरं पाहता सिक्रेटचा हा बहुमान अतिशय योग्य होता,कारण थोडाफ़ार का होईना पण सिक्रेट त्याच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वरचढ होता.बलात्कारासारख्या भीषण कृत्यावर असूनसुद्धा त्यात रिबनसारखा भडकपणा नव्हता,प्रोफ़ेटपेक्षादेखील सुंदर वातावरण निर्मिती आणि अप्रतिम प्रेमकथेची मांडणी त्यात होती.तसच सिक्रेटची असणारी पॉलिटिकल पार्श्वभुमी ह्यामूळे सिक्रेट अँकॅडेमीची एक अतिशय निर्धोक पसंती होती अस म्हणण्यास हरकत नाही.पण व्यवस्थित विचार केला तर ह्या तिघांची तुलना करण अतिशय चुकीच आहे.रिबनचा स्वतःचा एक वेगळा रंग होता,प्रोफ़ेटची एक वेगळी गाठ होती आणि सिक्रेटची चव काही निराळीच होती आणि त्यातली गुंतागुंत अतिशय मस्त जुळून आली होती.

सिक्रेटची कथा आहे ती बेंजामिन एस्पोशितो(रिकार्डो डॅरिन) ह्या रिटायर्ड लीगल कौन्सेलरची.२५ वर्षांपुर्वी लिलियाना कोलोटोवर(कार्ला क्युवेडो)घडलेल्या भीषण बलात्काराच्या आणि खुनाच्या केसवर त्याला पुस्तक लिहायचंय.त्याच्या आयुष्यात लिलियानाच्या केसचं विलक्षण महत्व आहे.त्याच संपूर्ण आयुष्य बदलणारी आणि त्याला अनेक गोष्टी शिकवणारी हि केस आहे.त्यावर पुस्तक लिहिण्यासाठी तो त्याच्या त्यावेळेसच्या बॉस असणारय़ा आयरीन हेस्टिंग्झ(सोल्डाद विलामिल)ला भेटतो.आयरीनवर बेंजामिनच मनापासून प्रेम आहे,आणि आयरीनच बेंजामिनवर पण आजपर्यंत ते अव्यक्तच.त्यालाही हीच केस जबाबदार आहे.सुरुवातीवरच अडकलेल्या बेंजामिनला आयरीन "सगळ्या गोष्टी जिथून सुरु झाल्या तिथुन तुझ पुस्तक सुरु कर" अस सांगितल्या नंतर २५ वर्षांपूर्वी आयरीनचा ऑफिसातला पहिला दिवस आणि लव्ह ऍट फ़र्स्ट साईट पासून फ्लॅशबॅक किंबहुना बेंजामिनच्या पुस्तकाची सुरुवात होते.

एका सुंदर सकाळी नको असताना मिळालेल्या लिलियानाच्या केसमुळे बेंजामिन आणि त्याचा सहकारी पाबलो(गुलेर्मो फ्रान्केला) वैतागलेला आहे,तरीही तो घटनास्थळी पोहोचतो.घटनास्थळी पोहोचल्य़ावर लिलियानाचा मृतदेह पाहून डिपार्टमेंटला शिव्या घालणारा बेंजा निःशब्द होतो.त्याचे डोळेच त्याच्या मनातली घालमेल सांगून जातात.रिकार्डो मोरालेस(पाबलो रागो)ह्या लिलियानाच्या पतीला तो भेटतो आणि गुन्हेगाराला नक्की पकडू अस आश्वासन तो त्याला देतो.रिकार्डोची मदत घेऊन आणि लिलियानची आधीपासूनचे फ़ोटो बघून गोमेझ(झेवियर गोडिनो)हा लिलियानाचा जुना मित्र गुन्हेगार असावा असा त्याची शंका आहे.पूढे तो गोमेझला पकडतो आणि त्याला शिक्षा होते.मात्र काहीच दिवसांत गोमेझची सिक्रेट आणि सिक्युरिटी सर्व्हिसेस मध्ये नेमणुक केली जाते आणि तो सुटतो.आता हे गोमेझ प्रकरण चांगलच अंगावर आलय हे लक्षात घेऊन आयरीन बेंजामिनला ब्युएनो आयरेस सोडून जायला सांगते आणि तो दुर निघून जातो.पुस्तकाचा शेवट करण्यासाठी किंबहुना त्याच्यावर कोणताही आक्षेप नसावा यासाठी बेंजामिन रिकार्डोकडे जाण्याचे ठरवतो.तो आपल्यापासून काहीतरी लपवतोय ह्याची बेंजामिनला खात्री आहे आणि त्यासाठी तो तिथेच थांबतो आणि अतिशय धक्कादायक शेवट समोर येतो.


चित्रपटाच्या शीर्षकात असलेल्या आईज् ह्या शब्दाला खरतर विलक्षण महत्व त्यातल्या पटकथेने आणि अभिनेत्यांच्या अभिनयाने मिळवून दिलय,डोळ्यांद्वारे व्यक्त होणारया एक्स्प्रेशन्सचा ह्यापेक्षा सुंदर वापर मी अद्याप बघितला नाही.त्यासाठी अभिनेत्यांचे खरच मनापासून कौतूक.सिनेमाची सिनेमेटोग्राफी सुद्धा उल्लेखनीय आहे.फ़ुटबॉल स्टेडियम मध्ये गोमेझला पकडण्याचा सीन अविश्वसनीय आहे;किंबहूना तेवढा सुंदररित्या शूट केलेला सीन आजपर्यंत पाहण्यात नाही.आजवर बघितलेल्या सर्वोत्कृष्ट ३ सीन्समध्ये त्याचा सहभाग नेहमीच असेल.सिनेमाची कथा खरतर सांगण्याजोगी नाहीये कारण त्याविषयी बोलण्यासारखं खुप काही आहे,त्याबाबत २०-२५ अतिशय मोठे मोठे लेख कोणीही लगेच लिहू शकतो.मोत्याची माळ गुंफ़ावी तेवढ्या सुंदरतेने आणि नाजुकपणे कथा सांभाळण्यात आलीये.आणि कथेला जोड मिळालीये ती अभिनयामूळे.

पहिल्याच नजरतेत कोणतातरी अभिनेता आवडून जावा आणि त्याचा हार्डकोर फॅन व्हाव अस सहसा घडत नाही,पण रिकार्डोच्या आणि विलामिल सोल्दाद बाबतीत तस घडेल ह्याची मला शाश्वती आहे.त्यांचा अभिनय कमाल आहे.त्यांच प्रत्येक गोष्टीकडे पाहणं,बोलणं मनाला मोहुन टाकणार आहे.आणि तसच काहीस आहे गुलेर्मो फ्रान्केला,पाबलो रागोच.सर्वांचाच अभिनय खल्लास आहे.वर नमुद केलेल्या सगळ्यागोष्टींसाठी मनापासून आभार मानायचे ते म्हणजे जुआन जोस कँप्बेलाच.त्याची दिग्दर्शनातली संयतता,मॅच्युरिटी आणि व्यवस्थितपणा कौतूक करण्याजोगा आहे.त्याला आणि संपुर्ण सिनेमाला मिळालेल ऒस्कर त्यामूळे खरच फ़ार चांगल वाटत.


सरतेशेवटी सिक्रेट पाया आहे तो प्रेम आणि पॅशन ह्या आयुष्यातल्या दोन सर्वात महत्वाच्या गोष्टींवर;अशा गोष्टी की ज्यावर जवळपास सगळचं अवलंबून असत.ड्रामा आणि थ्रिलर ह्यांच कॉम्बिनेशन अवलंबून असत ते दिग्दर्शक आणि कलाकारांवर;ते फ़सल तर सगळच फ़सत.पण सिक्रेट कुठेही फ़सत नाही,फ़सवतही नाही.तो आयुष्य दाखवत्तो अशा माणसाच जो रिटायर होऊनसुद्धा आजवर प्रेम कबुल करायला घाबरतोय,तो आयुष्य दाखवतो अशा स्त्रीचं जिचा संसार सुखाचा आहे पण अजुनही त्याच्यासाठी ती सगळं सोडायला तयार आहे,तो आयुष्य दाखवतो अशा मित्राच ज्याने आपल्या मित्रासाठी जीव द्यायला सुद्धा मागेपुढे बघितल नाही आणि तो आयुष्य दाखवतो अशा दुर्दैव्याचं ज्याने सर्वस्व गमावलय पण ज्याने ते हिरावल आहे त्याला फ़क्त शिक्षा करण्याचच फ़क्त पॅशन असलेल्या माणसाच;एवढी मोठी भावनांची सांगड हा सिनेमा अतिशय सहजतेने मांडतो,एक असा सिनेमा जो त्याच्या प्राक्तनाशी संपूर्णपणे पात्र आहे.शेवटी एबर्ट म्हणतो त्याप्रमाणे खरोखरीच असा खरा सिनेमा फ़ारच क्वचितच बनतो आणि म्हणूनच किंबहूना अशा काही सिनेमांना परफ़ेक्ट सिनेमा म्हणतात.


अनिकेत सुरगुडे